प्राकृत संस्कृत फारसी अरबी भले भले शब्द देशी विदेशी वैभवे तू महाराष्ट्रास नेशी माय मराठी तू कशी जन्मशी...
सप्तशतींची गाथा प्राकृतात प्रसवली भरजरी पितांबर सह्याद्रीस नेसविली प्राकृताची गोडी संस्कृताची प्रचुरता शब्दांची गुढता संत कवींनी वाढविली
विवेकाचा सिंधू उफाळून आला ज्ञानेशाची दीपिका भावार्थ साधला चरित्र लीळांचे माहीमभटा लिहिले मराठीचे बालपण त्यांनी पाहिले
नामदेव कीर्तनाचे रंगी नाचला निरक्षर चोखोबाने विठ्ठल वाचीला जनाबाईने श्रमातून विठ्ठल पूजीला शब्दा शब्दा मधून विठ्ठल वाहिला
मराठीचे दारात चिखल साठला महाराष्ट्र सारा परचक्राने पेटला भाषेत घुसली मग भाषा निराळी फारसी अरबी हड्डी मासी खिळली
दुर्ग झाले किल्ले खड्ग झाल्या तलवारी धोतराच्या झाल्या तुमानी परचक्रे किती आस्मानी सुल्तानी !
तशात रचली किती कवणे पुराने माय मराठीचे नव्या रूपात अवतरणे एकनाथी भागवत तुकोबांची गाथा किती नमवावा तया चरणी माथा !
मनाच्या श्लोकांचा दासाला बोध झाला बखरी शकावल्या जंत्र्या किती निर्मिल्या श्लोक आरत्या अभंग अन् भुपाळ्या मराठीच्या अंगावर अलंकार चढविला
लावणीचे लावण्य पोवाड्याचे धिटपण फटक्यांचे शहाणपण देवाचे निरूपण गीत संगीताने रूप सजले मराठीचे गुण गाई अभिजीत माय मराठीचे...
- अभिजीत घाडगे (8793884978)