भागोजी नाईक आदिवासी भिल्ल समाजात जन्म व बालपण :
भागोजी नाईक यांचा जन्म १८०४ साली एका भिल्ल आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे जन्म गाव नांदूरशिंगोटे होय. सिन्नर पासून पूर्वेला पुणे हायवेला लागून नांदूरशिंगोटे गाव आहे. या गावात मराठा समाज, भिल्ल समाज, महादेव कोळी समाज, नवबौद्ध समाज, अशा विविध जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते व अद्यापि राहत आहे. भागोजी नाईकांना 'महिपती' नावाचा पाठचा भाऊ तर 'बायजाबाई' नावाची बहिण होती. तसेच 'यशवंत आणि गुलाब' नावाची दोन मुले होती. अशावेळी घरात आई वडील धरून जवळ जवळ सहा माणसे होती. उदरनिर्वाहासाठी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करणे हाच काय तो त्यांच्या चरितार्थाचा मार्ग होता. शिवाय आदिवासी म्हटलं म्हणजे हमखास त्याच्या दारात दोन चार शेळ्या, कोंबड्या, एखादी म्हैस, तिची पारडी असायची. भागोजीच्या घरात देखील शेळ्या होत्या. दिवस उगवला म्हणजे सृष्टीला जाग येते. तो सूर्य कुणाचा भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो. समस्त सृष्टी त्यांच्या आगमनाने प्रफुल्लित होते. समस्त प्राणी जगताला भारून टाकते. तसेच काहीसा भागोजी नायकाचा तळपता सूर्य कोवळ्या प्रकाशाप्रमाणे दिवसागणिक वाढत होता. त्यास समाजाच्या वेदनांची, दुःखाची जाणिवपूर्वक संवेदना होत होती. त्याच्या आईने कानात घातलेल्या बाळ्या त्यास अधिक शोभून दिसत होत्या. जणू काही भविष्यकालिन कार्यकर्तृत्वाचा भास त्या बाळ्या दर्शवित होत्या.
आईवडील काबाडकष्ट करीत होते. शेतात मोलमजुरी करणे आणि शेतात शेळ्या चारून, त्यात शेळ्यांनी दिलेले बोकड मोठे झाल्यावर सिन्नरच्या बाजारात विकून आलेल्या पैशाआडक्यात संसाराचा गाडा चालविणे हे चित्र समस्त आदिवासी बांधवांच्या घरी हमखास पहावयास मिळते. मात्र शेळ्या रानात चारण्याठी नेणे, त्यांचे संगोपन करणे, कोल्हे, कुत्रे, तरस, बिबट्या, वाघ यापासून पासून रक्षण करणे ही जोखमीची कामे भागोजीलाच पार पाडावी लागत असत. शेळ्या चारण्यासाठी नांदूर शिंगोट्याच्या दक्षिणेला असलेल्या चासखिंडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडुपे, गवत असल्याने शेळ्यांना भरपूर चारा उपलब्ध होई. त्यामुळे कुणा शेतकऱ्यााच्या मळ्याथळ्यात, उभ्या पिकात शेळ्या नेऊन चारण्याचा विषयच नव्हता. चासखिंडीतील निसर्ग वैभवाने माणसाला आणि मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात अन्नपाण्याची शिदोरीच दिली होती. सकाळी सकाळी भागोजी नाईक आणि त्यांचे सोबती खांद्यावर कुन्हाडी, विळे, कोयते घेऊन नेहमी शेळ्या चारण्यासाठी चासखिंडीमध्ये जात असत. दुपारी न्याहारीला फडक्यात बांधलेल्या बाजरीची नाहीतर ज्वारीची भाकरी आणि त्यावर लाल, हिरव्या मिरचीचा गोळा म्हणजे त्यांचे कोड्यास होय. रानात फिरत असतांना बाळद्यांना (शेळ्या जनावरे व त्यांची राखण आणि सांभाळ करणाऱ्या मुलांना गुराखी म्हणजेच बाळदी म्हणतात) व्हलगा, पान कोंबडी, लावरी, गांज्या, घोरपड, सरड्या, कोल्हा, तरस, वाघ, बिबट्या, साप अशा विविध प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, आणि जंगली श्वापदे यांची त्यांना ओळख होती. रोजच या प्रणाण्यांशी त्यांची गाठ पडत असल्याने जणूकाही त्यांचे ते सोबतीच होते. जोपर्यंत वन्यप्राणी आपल्याला त्रास देत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर हात उगारायचा नाही हे तत्त्व बाळदी पाळत होते. जोपर्यंत अंगाशी येत नाही तोपर्यंत कुणालाही दगाफटका करायचा नाही अशा जाणिवेने ही आदिवासी मुले आणि एकूणच आदिवासी समाज जगत आला आहे आणि तो असाच जगत राहणार आहे.
भागोजी आता तरणाबांड झाला होता. घरात पाठची बहिण बायजाबाई होती. भाऊ महिपती मात्र आईवडिलांबरोबर लोकांच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे. त्या काळात (इ.स. १८०० ते १९०० च्या कालखंडात) शेतात राबणाऱ्या मजुराला धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत असे. क्वचित प्रसंगी चारआठ आणे अशी रोख स्वरुपात मिळत असे. शिवाय कामाची विभागणी आलेली असायची. बायजा बाईने घरातील सारवणे, पाणी आणणे, जमल्यास भाकरी करून ठेवणे, भागोजीने शेळ्या वळणे ( राखणे) चारापाणी करणे.
महिपतीने आईवडीलांसोबत शेतात मजुरीस जाणे, अशा प्रकारे भागोजी नाईकांच्या कौटुंबिक चरितार्थाचा दिनक्रम होता. तसे पहिले तर एकूणच सर्व आदिवासी समाजात हे चित्र पहायला
मिळते. दररोज मोलमजुरी करून कष्टप्रद जीवन व्यतित करणारा हा समाज मोठे मूल्यांत्मक जीवन जगत आहे. स्वाभिमान आणि गरजांवर नियंत्रण ठेवत त्यांनी आपला हव्यास दूर ठेवून, एका परीने मानवी जीवनात येणारे दुःख कोसो दूर ठेवले आहे. ते सुखी आहेत. त्यांनी समाधानाच्या लक्ष्मण रेषा स्वतःभोवती आखून घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाबाबत नागरी लोकांना मोठे कुतूहल वाटते. नश्वर अशा मानवी जीवनाचा खरा अर्थ आणि सांप्रत जीवनाचा बोध पहिल्याप्रथम आदिवासींना झाला, असे म्हटल्यास आजिबात वावगे ठरणार नाही, याची शतप्रतिशत खात्री आहे. भगवतगीता देखील खऱ्या अर्थाने त्यांनाच प्रथम उमगली कारण ते नश्वर आणि अशाश्वत असे धनद्रव्य, सत्ता, संपती, अधर्माच्या व अनैतेच्या मार्गाने कधीच मिळवत नाहीत. या अर्थाने श्रीकृष्णाची भगवतगीता त्यांना चांगली समजली यास मोठा आधार सापडतो, तो त्यांच्या दररोजच्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीतून. त्यांनी ती जीवनमूल्य अंगिकारली आहेत, कारण समाज एकसंघ ठेवणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभाग घेणे, वाटून खाणे (सत्तेतील नव्हे, तर सत्मार्गाचे कष्ट करून मिळविलेले सांघिक फळ) भ्रष्टाचार न करणे, भीक न मागणे इ. असामान्य गुण त्यांच्यात विराजमान झालेले आहेत. मात्र नागरी जीवन जगणारे तथाकथित लोक त्यांना लंगोटे, मागासलेले म्हणतात आणि आता त्याच मागासलेपणाचे लेबल स्वतःला लावून घेण्यासाठी, सवलती मिळविण्यासाठी हे मागास नसलेले, सधन लोक अहोरात्र सरकार विरोधात लढत आहेत, हे २०२३ सालातील कटू वास्तव सत्य आहे. केव्हढा मोठा हा विरोधाभास...!
असो. कालाय तस्माय नमः
सौजन्य :- डॉ. श्री. गोपाल गवारी , लेखक , नाशिक